इस्रो करणार एकाच वेळी १०४ उपग्रहांचे प्रक्षेपण 
संशोधन प्रतिनिधी: ७ फेब्रुवारी २०१७
—-

भारतातर्फे अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात लवकरच एक जागतिक विक्रम केला जाणार आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) एकाच वेळी तब्बल १०३ उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येणार असून, त्यातील १०० उपग्रह विदेशी असणार आहेत. इस्रोच्या भरवशाच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे (पीएसएलव्ही सी ३७) हा विक्रम साधला जाणार आहे.

या आधी एप्रिल २००८ मध्ये इस्रोने एकाच वेळी दहा, तर जून २०१६ मध्ये एकावेळी २० उपग्रहांचे प्रक्षेपण केले होते. एकाच उड्डाणातून सर्वाधिक ३७ उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम रशियाच्या नावावर असून, नासातर्फे एका उड्डाणातून २९ उपग्रह अवकाशात पाठवण्यात आले आहेत. इस्रोतर्फे पीएसएलव्ही सी ३७ या उड्डाणातून प्रक्षेपित केले जाणारे शंभर मायक्रो उपग्रह इस्राइल, कझाकिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लंड आणि अमेरीका या देशांचे असून, त्यांचे एकत्रित वजन सुमारे ५०० किलो असेल. या व्यतिरिक्त भारताचा कार्टोसॅट २ (७३० किलो) तसेच आयएनएस १ए आणि आयएनएस १बी (दोन्ही मिळून ३० किलो) हे तीन उपग्रहही अवकाशात पाठवण्यात येणार आहेत.
एका उड्डाणातून अनेक उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याचे तंत्र क्लिष्ट असून, उपग्रहांना अवकाशात मुक्त करताना ते एकमेकांना धडकणार नाहीत अशा प्रकारे त्यांच्या मुक्ततेची वेळ आणि ठिकाण निश्चित करावे लागते. इस्रोमधील वरीष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शंभर विदेशी उपग्रह हे आकाराने लहान आणि वजनाने कमी असून त्यांना मायक्रो सॅटेलाईट म्हटले जाते. या उपग्रहांना पाचशे किलोमीटरच्या उंचीवर टप्प्याटप्प्याने मुक्त करण्यात येणार असून, त्या सर्व उपग्रहांचा संवेग, मुक्त होतानाचा कोन, दिशा आणि ठिकाण वेगळे असणार आहे. या उंचीवर प्रक्षेपकाला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी दीड तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे सर्व उपग्रह कक्षेत पाठवण्यासाठी आमच्याकडे पुरेसा कालावधी उपलब्ध आहे.’
श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून १५ फेब्रुवारीला पीएसएलव्ही सी ३७चे विक्रमी प्रक्षेपण होणार आहे. अधिक वजन वाहून नेऊ शकणाऱ्या पीएसएलव्हीच्या एक्सएल या श्रेणीद्वारे हे उड्डाण होईल. याच प्रक्षेपकाच्या साह्याने इस्रोने एकाच वेळी अनेक उपग्रहांचे याआधी प्रक्षेपण केले आहे. तसेच, भारताची चांद्रमोहीम आणि मंगळमोहीमही याच प्रक्षेपकाद्वारे यशस्वी झाली आहे.
अवकाशातील उपग्रहांची संख्या दहा टक्क्यांनी वाढणार                 
एकाच वेळी १०३ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित झाल्यामुळे अवकाशात कार्यरत असणाऱ्या उपग्रहांची संख्या एका दिवसात दहा टक्क्यांनी वाढणार आहे. सध्या सर्व देशांचे मिळून सुमारे ११०० उपग्रह कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे इस्रोतर्फे आतापर्यंत ७९ विदेशी उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. पीएसएलव्ही सी ३७च्या एकाच प्रक्षेपणातून विदेशी उपग्रहांचे शतक साजरे होणार असल्यामुळे ती संख्याही १७९ वर पोचेल. एकाच उड्डाणातून अनेक उपग्रह प्रक्षेपित करणे हे अत्यंत किफायतशीर असून, यामुळे एका उपग्रहाच्या प्रक्षेपणाचा खर्च तुलनेने बराच कमी होतो. या प्रक्षेपणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इस्रोचे स्थानही बळकट होणार आहे.
—-
Advertisements